देवरुख: युथ फोरम, देवगड आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन यामध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी ‘विविध परंपरा आणि धर्मातील व्यक्तीचित्रे’ हा विषय देण्यात आला होता. विलास रहाटे यांनी तीन फूट बाय चार फूट आकारात ही आकर्षक रांगोळी साकारली होती. उत्तर पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील अपातानी समाजातील वृद्ध स्त्री साकारून, त्या समाजाची वेशभूषा, दागिने, चेहऱ्यावरील पारंपारिक टॅटू आणि मोठ्या आकारातील कानातले हे त्यांचे खास सांस्कृतिक वैशिष्ट्य दाखवण्याचा उत्तम प्रयत्न या रांगोळीच्या साह्याने करून परीक्षक व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
श्री. विलास विजय रहाटे यांना प्रथम क्रमांकाचे रु.१५,०००/- बक्षीस, तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा या राज्यातील अनेक स्पर्धकही सहभागी झाले होते. या स्पर्धेतील रांगोळ्यांचे प्रदर्शन २५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे.





