राजापूर : तालुक्यातील तळवडे खिंडीत पैशांच्या व्यवहारातून एका तरुणावर लाकडी दांडा आणि लोखंडी रॉडने भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गणेश आत्माराम आर्डे (वय ३८, रा. पाचल बाजारवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात मावस भावासह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गणेश आर्डे हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून मूळ गावी काजिर्डा येथे जात होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास तळवडे खिंडीत पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने आपली मोटारसायकल गणेश यांच्या गाडीसमोर आडवी घालून त्यांना थांबवले. यावेळी गणेश यांचा मावस भाऊ पांडुरंग गणाजी पाटेकर (रा. कोळंब) याने पैशांच्या देवाणघेवाणीच्या जुन्या रागातून हातातील लाकडी दांड्याने गणेश यांच्या उजव्या हातावर जोरदार प्रहार केला.
यावेळी पांडुरंगसोबत असलेल्या दोन अनोळखी साथीदारांनीही गणेश यांच्यावर हल्ला चढवला. एका राखाडी शर्ट घातलेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने गणेश यांच्या पाठीवर वार केले, तर दुसऱ्या पांढरा चौकडा शर्ट घातलेल्या व्यक्तीने लाकडी बांबूने त्यांच्या पायावर बेदम मारहाण केली. या हल्लेखोरांनी गणेश यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमी गणेश आर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी पांडुरंग पाटेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.





