रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी मधलीवाडी येथे पालापाचोळा जाळण्याच्या शुल्लक कारणावरून एका ७७ वर्षीय वृद्धावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात आत्माराम बाळाराम बोरकर हे जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी संतोष बाबुराव सुर्वे (रा. चिंचखरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आत्माराम बोरकर हे आपल्या घरासमोरील आणि परिसरातील झाडांचा पडलेला पालापाचोळा झाडून गोळा करत होते. घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली गोळा केलेला हा पातेरा ते जाळत असताना, आरोपी संतोष सुर्वे त्या ठिकाणी आला. यावेळी जुन्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून सुर्वे याने बोरकर यांच्याशी वाद घातला आणि हातातील कोयत्याच्या उलट्या बाजूने त्यांच्या मानेवर व डाव्या मांडीवर प्रहार केला. या झटापटीत कोयत्याची धार लागल्याने बोरकर यांच्या डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





