GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकासह मानवंदना

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे. यावर्षी प्रथमच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या उपस्थितीत मानवंदना देऊन औपचारिक अभिवादन करण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्याने शिवजयंती उत्सवात एक वेगळाच उत्साह आणि शिस्तबद्धता पाहायला मिळाली.

या मंगल प्रसंगी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते महाराजांच्या अश्वारूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत मानवंदना सादर केली. बँडच्या शौर्यपूर्ण सुरावलींनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महाराजांच्या पराक्रमाला आणि स्वराज्याच्या महान विचारांना दिलेली ही सलामी उपस्थितांसाठी अभिमानास्पद ठरली. जिल्ह्यात अशा प्रकारे पोलीस बँडसह मानवंदना देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या ऐतिहासिक घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.

या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बँड पथकातील जवानांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली जात असतानाचा हा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या उपक्रमामुळे यंदाच्या शिवजयंतीला एक विशेष गौरव प्राप्त झाला असून, पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3417564
Share This Article