GRAMIN SEARCH BANNER

समुद्र किनाऱ्यांवर ‘टार बॉल्स’चे महासंकट; कोकण ते मुंबई किनारपट्टी धोक्यात

Gramin Varta
44 Views

रायगड: मुंबई व कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणारे काळे आणि चिकट ‘टार बॉल्स’ आता केवळ समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य खराब करणारा कचरा राहिलेले नाहीत, तर ते सागरी पर्यावरणावर घोंगावणाऱ्या एका अतिशय गंभीर संकटाचे प्रतीक बनले आहेत. मुंबई, नवी मुंबई, पालघर, उरण आणि अलिबागसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अधून-मधून उद्भवणारी ही समस्या आता दरवर्षीची झाली असून, यामुळे संपूर्ण समुद्रकिनारे तेलकट काळ्या गोळ्यांनी विद्रूप होताना दिसत आहेत.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘टार बॉल्स मॅनेजमेंट रूल्स २०२६’चा मसुदा जाहीर करून नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि मच्छिमारांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत, ज्यावर ‘आवाज फाउंडेशन’ने आपले तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. संस्थेच्या विश्वस्त सुमैरा अब्दुलअली यांच्या मते, मुंबई आणि अलिबाग परिसरात गेली २५ वर्षे सातत्याने हे ‘टार बॉल्स’ आढळत असून, २००१ पासून दरवर्षी मे महिन्याच्या मध्यापासून ते पावसाळ्यापर्यंत ही समस्या कायम राहते, ज्यामुळे हा कोणताही अपवादात्मक प्रकार नसून नियमित पर्यावरणीय संकट असल्याचे स्पष्ट होते. ‘आवाज फाउंडेशन’ने प्रशासनाच्या भूमिकेवर बोट ठेवत म्हटले आहे की, सध्या सरकारी यंत्रणेचे काम फक्त ‘किनाऱ्यावर आले की साफ करा’ इतकेच मर्यादित आहे, जिथे हजारो स्वयंसेवक किनाऱ्यावरून टार बॉल्स गोळा करतात, परंतु मूळ समस्या रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. म्हणूनच संस्थेने सरकारकडे या टार बॉल्सचे नमुने प्रयोगशाळांमध्ये नेण्याची परवानगी देणे, त्याचे अहवाल सार्वजनिक करण्याची व्यवस्था करणे आणि पर्यावरण निधीतून तातडीच्या उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली आहे.

मुळात ‘टार बॉल्स’ म्हणजे समुद्रात जहाजांमधून सांडलेल्या खनिज तेलाचे घट्ट झालेले छोटे गोळे असतात, जे तेलगळती, बेकायदेशीर तेल विसर्ग, ऑफ शोअर ड्रिलिंगमधील त्रुटी आणि समुद्री अपघातांमुळे समुद्रात मिसळतात व नंतर लाटा, सूर्यप्रकाश आणि रासायनिक प्रक्रियांमुळे घट्ट होऊन किनाऱ्यावर येतात, अनेकदा तर ते वाळूत मिसळल्याने हे प्रदूषण नागरिकांच्या लक्षातही येत नाही. या खनिज तेलाच्या गोळ्यांचा सर्वाधिक आणि जीवघेणा फटका सागरी जीवसृष्टीला बसत असून समुद्री पक्ष्यांच्या पंखांना हे तेल चिकटल्याने त्यांची उडण्याची क्षमता संपुष्टात येते, तर कासव, मासे, खेकडे आणि इतर सागरी जीव या गोळ्यांना अन्न समजून गिळतात, ज्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला गंभीर इजा होते. किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी हे संकट अधिक भीषण ठरत आहे कारण या तेलकट पाण्यामुळे समुद्रातील माशांची संख्या तर घटतेच, शिवाय विषारी घटक माशांच्या शरीरात साचल्याने असे मासे बाजारात ग्राहकांकडून नाकारले जातात. एवढेच नव्हे तर हे टार बॉल्स मच्छिमारांच्या जाळ्यांना चिकटल्याने जाळी पूर्णपणे खराब होतात, त्यांच्या दुरुस्ती आणि साफसफाईचा आर्थिक खर्च वाढतो आणि जाळ्यात हे गोळे अडकल्याने जाळे कमालीचे वजनदार होऊन मच्छिमारांना खांदेदुखी व कंबरदुखी यांसारख्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे काही भागांत मासेमारी पूर्णपणे बंद ठेवावी लागत असल्याने हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे.

या सागरी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावरही अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये त्वचेवर खाज सुटणे, ॲलर्जी, डर्माटायटिस, श्वसनाचे विकार, दमा आणि तीव्र डोकेदुखी यांसारखे त्रास सातत्याने वाढत आहेत. जागतिक स्तरावर २०१० मधील ‘डीपवॉटर होरायझन’ दुर्घटना, २०१७ मधील चेन्नई तेलगळती आणि मुंबईजवळील ‘एमएससी चित्रा’ अपघाताने या संकटाचे भयावह परिणाम जगाने आधीच पाहिले आहेत, तर स्थानिक पातळीवर उरणच्या ओएनजीसीतून होणाऱ्या तेलगळतीमुळे हे संकट अधूनमधून ओढावत राहते. सध्या आखाती संघर्षामुळे समुद्रात वाढत असलेल्या तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात हा धोका आणखी तीव्र आणि घातक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3418020
Share This Article