काम दर्जेदार करण्याची स्थानिकांची मागणी
अजय सावंत / रत्नागिरी : मिऱ्या – नागपूर महामार्गाचे सध्या नाचणे येथील जेके फाईल ते टीआरपी मार्गावरील काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ज्या मार्गावरून वाहने ये-जा करत होती तो मार्ग सोमवारपासून कामासाठी बंद करण्यात आला. सध्या नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या बाजूच्या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र कंत्राटदाराकडून महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने एकाच मार्गावरून वाहनांची ये-जा होत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवकाळी पावसामुळे महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे काम करत असताना कामाचा दर्जा उत्तम राखणे ही जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची तसेच महामार्ग अधिकाऱ्यांची आहे.
काही दिवसांपूर्वी महामार्ग अधिकाऱ्यांनी टीआरपी येथे स्थानिकांची महामार्गाच्या कामाबाबत भेट घेतली होती. या भेटीत महामार्ग अधिकाऱ्यांना येथील पावसाबद्दल स्थानिकांनी माहिती दिली. तसेच महामार्गाचे काम उत्तम दर्जाचे व्हावे व सर्विस रोडचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे केली होती. हे सर्व काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन महामार्ग अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवासी तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तथा प्रशासक यांना दिले होते.
मात्र इतके दिवस उलटूनही सर्विस रोडसह गटाराचे कामही अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचारी व स्थानिक रहिवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र कंत्राटदाराकडून सर्विस रोडकडे दुर्लक्ष होत आहे. महामार्ग व सर्विस रोडचे काम संबंधित कंत्राटदार व महामार्ग अधिकारी यांनी उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी मागणी स्थानिक रहिवासी यांच्याकडून करण्यात आली आहे.






