GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : वाशिष्टी नदीकिनारी अवैध दारूसाठ्यावर धाड, मुद्देमाल जप्त

Gramin Varta
111 Views

चिपळूण : तालुक्यातील पोफळी आणि शिरगाव सीमेलगत असलेल्या वाशिष्टी नदीच्या किनारी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६,३९५ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी शिरगाव येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोफळी आणि शिरगाव हद्दीतील वाशिष्टी नदीच्या काठावर एका शेवरीच्या झाडाखाली अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चिपळूणला संलग्न असलेले गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मारोती तुकाराम वागदकर आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संशयित आरोपी दीपक शिवाजी चव्हाण (वय ३१, रा. शिरगाव बाजारपेठ, ता. चिपळूण) हा चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारूसाठा बाळगून असताना मिळून आला.

पोलिसांनी आरोपीकडून रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स नंबर १ व्हिस्की, डीएसपी ब्लॅक डीलक्स, मॅकडॉवेल्स रम आणि टँगो पंच देशी दारू अशा विविध कंपन्यांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ६,३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मारोती वागदकर यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक चव्हाण याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199170
Share This Article