GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापुरात सिलिंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंब उद्ध्वस्त, महिलेचा मृत्यू, दोन चिमुकले आईविना पोरके

Gramin Varta
88 Views

दोन्ही मुले जखमी, ऐन गणेशोत्सवातील घटनेने शिवणे गवळवाडीवर शोककळा

संगमेश्वर / प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गवळवाडी गाव शोकसागरात बुडाले. गणपती साजरा करण्यासाठी कोल्हापूरहून मूळ गावी परतण्याच्या तयारीत असलेल्या भोजणे कुटुंबावर काळाने झडप घातली. घरातील गॅस स्फोटात शीतल अमर भोजणे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या दोन चिमुकल्या लेकरांना आयुष्यभरासाठी आईचा आधार हरपला आहे. अनंत भोजणे (वय ६०), शीतल अमर भोजणे (२९), प्रज्ज्वल अमर भोजणे (साडेपाच वर्षे) आणि इशिका अमर भोजणे (३) अशी जखमींची नावे आहेत. स्फोट आणि आगीत दोन घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले.

अमर भोजणे हे कोल्हापूरमध्ये हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होते. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा बेत आखला असतानाच, ‘एक रात्र थांबून सकाळी जाऊ’ या छोट्याशा निर्णयाने आयुष्य उद्ध्वस्त केले. रात्री शीतल यांनी स्वयंपाकघरात जेवण गरम करण्याचा प्रयत्न करताच गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला आणि क्षणात संपूर्ण संसार उध्वस्त झाला.

घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने कोल्हापूर गाठून मदतीचा हात दिला. सरपंच राजू पवार यांनी नातेवाइकांची विचारपूस केली व ग्रामपंचायतीतर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनोरंभ कॉलनीत राहणारे अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते कामावर गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील अनंत, पत्नी शीतल आणि दोन्ही मुले घरात होती. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरात गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन आणि मीटरची जोडणी केली होती. मात्र, गॅस पुरवठा सुरू केला नव्हता. रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक घरात स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात आगीच्या झळा पोहोचल्या तसेच प्रापंचिक साहित्याचे जळून नुकसान झाले.

स्फोटामुळे घरातील पडदे जळाले. छताचे सिलिंग आणि भिंतीचे प्लास्टर निघाले. आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत अनंत भोजने आणि शीतल भोजने हे घरातून बाहेर पळत आले. हा प्रकार लक्षात येताच गल्लीतील राजेश्वरी सचिन देशमाने, रमेश पाटील, रविना पाटील यांनी अंगावर ब्लँकेट टाकून दोघांची आग विझवली तसेच घरात अडकलेला प्रज्वल आणि इशिका या दोघांना बाहेर काढले. खासगी वाहनातून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

पंधरा मिनिटांत आग विझवली

वर्दी मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझवली. या आगीत भोजने यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले तसेच समोरचे रमेश पाटील यांच्या घराचे एक ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, मोहसीन पठाण, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार आणि सागर पाटील यांनी आग विझविली.

गॅस पुरवठा कंपनी विरोधात संताप

घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने सोमवारीच या परिसरात मीटर जोडणीचे काम सुरू केले. गॅस जोडणी केलेल्या पहिल्या घरात पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्याने गॅस पुरवठा कंपनी विरोधात नागरिकांनी प्रचंड संपात व्यक्त केला. मीटर जोडणी पूर्ण झाल्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पुरवठा कसा सुरू केला? असा सवाल या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मयूर भोसले यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3209942
Share This Article