GRAMIN SEARCH BANNER

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच कोकणात दुर्मिळ पाहुण्यांचे आगमन; देवरुखमध्ये ‘चतुरंग’ तर बोईसरमध्ये ‘काळ्या मानेची टिबुकली’ अवतरली

Gramin Varta
139 Views

रत्नागिरी : हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणच्या निसर्गवैभवात भर घालणाऱ्या स्थलांतरित परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले असून, यंदा पक्षीप्रेमींसाठी एक सुखद धक्का देणारी घटना घडली आहे. बदकांच्या दुर्मिळ प्रजातींनी कोकण किनारपट्टीवर हजेरी लावली असून, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ‘चतुरंग’ बदकांचा थवा, तर बोईसर येथे अत्यंत दुर्मिळ अशी ‘काळ्या मानेची टिबुकली’ आढळून आली आहे. उत्तर आशियातील कडाक्याची थंडी आणि बर्फाळ हवामान टाळण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पक्ष्यांमुळे कोकणातील जलाशये गजबजून गेली असून, या नयनरम्य पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीनिरीक्षकांनी गर्दी केली आहे.

दरवर्षी हिवाळ्याच्या तोडावर उत्तर आशियातील अनेक प्रदेशांमधून बदकांच्या विविध प्रजाती महाराष्ट्रात दाखल होतात. मात्र, यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांचे दर्शन महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ मानले जाते, अशा प्रजातींचे आगमन झाले आहे. रविवारी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात पक्षीनिरीक्षक डॉ. शार्दुल केळकर यांना ‘चतुरंग’ या देखण्या बदकाचे दर्शन घडले. स्थानिक पातळीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याच दिवशी, पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर रस्त्यावरील श्रीकृष्ण तलावात पक्षीनिरीक्षक आशिष बाबरे यांना ‘काळ्या मानेची टिबुकली’ हा पक्षी आढळून आला. आशिष बाबरे हे १६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे पक्षीनिरीक्षणाकरिता श्रीकृष्ण तलावानजीक गेले असता, त्यांना हा दुर्मिळ योग साधता आला. तेव्हापासून हा पक्षी याच तलावात विहार करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, काळ्या मानेच्या टिबुकलीची महाराष्ट्रातील ही केवळ दुसरीच नोंद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मूळचे तिबेटच्या पठारावर प्रजनन करणारे हे पक्षी हिवाळ्यात प्रामुख्याने दक्षिण चीनच्या उबदार भागात स्थलांतर करतात. काही वेळा ते उत्तर भारतात येतात, परंतु मध्य भारतापर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंत त्यांचा प्रवास होणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जैवविविधतेत मोलाची भर पडली आहे. सामान्यतः बदक आणि टिबुकली हे दोन्ही पाणपक्षी असल्याने पाहताना सारखेच वाटतात, परंतु त्यांच्या शरीररचनेत सूक्ष्म फरक असतो. बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये पोहण्यासाठी त्वचेचा पडदा असतो, तर टिबुकलीच्या पायांच्या बोटांवर त्वचेचा स्वतंत्र थर असतो, अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे.

सध्या राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण पट्ट्यात, अशा प्रकारे स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल वाढली आहे. निसर्गाचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी देवरुख आणि बोईसर परिसरात पक्षीप्रेमी व अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या दुर्मिळ पाहुण्यांच्या आगमनामुळे कोकणच्या पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3198670
Share This Article