GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाचा चेहरामोहरा बदलणार; १३ कोटींच्या निधीतून नूतनीकरणाला प्रारंभ

Gramin Varta
85 Views

रत्नागिरी : अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कार्यरत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे रूप पालटण्यासाठी शासनाने आता कंबर कसली असून, या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी १३ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी देण्यात आल्याने नूतनीकरणाच्या कामांनी आता मोठी गती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये रुग्णालयातील एकूण २५ वॉर्ड इमारतींचे बळकटीकरण आणि आधुनिक नूतनीकरण करण्यात येणार असून, जुन्या वॉर्डांना सुसज्ज आणि नव्या स्वरूपात आणण्याचे मुख्य उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

रुग्णांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रुग्णालय परिसरातील सुमारे ९०० मीटर लांबीच्या रस्त्यांचे काम करण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा ४५० मीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती व बळकटीकरणही हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकल्पासाठी ११ कोटी ७२ लाख ३३ हजार रुपयांची तांत्रिक मान्यता दिली असून, निविदा प्रक्रियेनंतर ९ कोटी ८७ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चातून ‘आर. सी. बिडवे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स’ यांच्यामार्फत हे काम पूर्णत्वाकडे नेले जात आहे. सध्या रुग्णालय परिसरात हे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्थानिक प्रशासनाकडून कामाच्या दर्जावर आणि वेळेवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. या विकासकामांमुळे रुग्णांना भविष्यात अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3357473
Share This Article