GRAMIN SEARCH BANNER

बिबट्याच्या कातड्याची मोठी तस्करी उघड

Gramin Varta
523 Views

रत्नागिरी कस्टम विभागाकडून चौघांना बेड्या

रत्नागिरी : कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास एक मोठी धाडसी कारवाई केली. बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत विभागाने दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर महामार्गावर सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी एक मॅरून रंगाची किया सेल्टोस गाडी अडवून तिची कसून झडती घेतली असता, त्यात दोन बिबट्यांची कातडी लपवून ठेवल्याचे उघड झाले. सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली गाडी जप्त केली असून, घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.

या कारवाईत अटक करण्यात आलेले चार आरोपी विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. त्यापैकी दोन आरोपी कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील असून, इतर दोन जण सातारा आणि लातूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईत अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक यांच्यासह निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा आणि हवालदार संजय जाधव व अभिषेक यादव यांचा सहभाग होता.

रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, वन्यजीव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा १९६२ आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही अवैध व्यवहारांची माहिती मिळाल्यास त्यांनी ७२१९२१२३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article