GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात गणेशोत्सव तयारीचा आढावा

मुख्याधिकाऱ्यांकडून विसर्जन घाटांची पाहणी

चिपळूण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषदेने घेतलेल्या विविध तयारींचा आढावा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सोमवारी घेतला. नगरपरिषद मुख्यालयात सर्व विभाग प्रमुखांसमवेत आयोजित बैठकीत शहरातील स्वच्छता, सुरक्षा, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा तसेच विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीनंतर मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, नगर अभियंता दिपक निबांळकर, विद्युत विभाग प्रमुख संगिता तांबोळी, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे तसेच बांधकाम मेस्त्री रवि सातपुते यांच्यासह प्रत्यक्ष विसर्जन घाटांची पाहणी केली.

यावेळी विसर्जन घाटांवरील सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र काही ठिकाणी पूरक सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.

गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांची व्यवस्था, तात्पुरती सुरक्षा उपाययोजना तसेच वाहतूक नियंत्रण याबाबत विभागप्रमुखांना विशेष काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले.

नगर परिषदेच्या वतीने गणेशोत्सव काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सोयीस्कर वातावरण मिळावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Total Visitor Counter

2475126
Share This Article