रत्नागिरी : जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती रत्नागिरी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत कोळंबे येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या उपस्थितीत कृषी दिंडीने व वृक्षारोपणाने झाली.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी विकास अधिकारी अभिजीत गडदे, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, गटविकास अधिकारी चेतन शेळके, जिल्हा कृषी अधिकारी विकास मुळीक, कृषी विद्यावैत्ता डॉ. किरण माळशे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, सरपंच प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कृषी महाविद्यालय दापोलीच्या आरएडब्ल्यूई कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी कोळंबे येथे कृषी माहिती केंद्र स्थापन करून बीजप्रक्रियेवर प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान अनुभवता आले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन शेतकऱ्यांना बायोगॅस युनिट, गोठा बांधकाम व फळबाग लागवडीसाठी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप शेतात चारसुत्री भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आला. ज्यातून शेतकऱ्यांना सुधारित भात उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. या कार्यक्रमासाठी कृषी विभाग व पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.