GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात अनधिकृत बांधकामप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

चिपळूण : शहरातील भोगाळे येथील महावीर पॅलेस इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण नगर परिषदेने दिलेल्या तक्रारीनुसार, हे बांधकाम १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु असून, आजतागायत पूर्ण झालेले नाही.

चिपळूण नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक विजय बचन गमरे (३०, रा. खेड बावशेवाडी, चिपळूण) यांनी याप्रकरणी मंगळवार १७ जून रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गमरे यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. संभाजी परशराम गरुड (रा. महावीर पॅलेस, भोगाळे, चिपळूण) यांनी भोगाळे येथील महावीर पॅलेस या इमारतीमध्ये विनापरवाना पत्राशेड, जिन्याचे बांधकाम, पाण्याची टाकी आणि युटिलिटी व कपाटे बांधली आहेत. हे बांधकाम अनधिकृत असून, त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.

चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र प्रांतिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२ आणि ५३ नुसार एम.आर. क्र. १४३/२०२५ अन्वये डॉ. संभाजी गरुड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2455627
Share This Article