गुहागर: गुहागर-चिपळूण मार्गावरील मार्गाताम्हाणे येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, या घटनेमुळे रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल रात्री घडलेल्या या अपघातात दोन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मार्गाताम्हाणे येथील बोऱ्या फाट्याजवळील समर्थ नर्सरीजवळ झाला. येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गुहागरहून चिपळूणकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने रस्त्यावरील खड्ड्यामुळे नियंत्रण गमावले. त्यामुळे थेट बॅरिकेड्स उडवत ती गाडी समोरून येणाऱ्या इरटिका गाडीवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि गाड्या रस्त्याच्या एका बाजूला फुटबॉलसारख्या फेकल्या गेल्या.
गुहागर-चिपळूण या महत्त्वाच्या मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. मार्गाताम्हाणे येथे वारंवार अपघात होत असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अर्धवट अवस्थेतील काम यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात आणखी गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.