GRAMIN SEARCH BANNER

कुणबी महोत्सवात ३१ मान्यवरांचा ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने गौरव

Gramin Varta
803 Views

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाला गती देणारा पहिला ‘कुणबी महोत्सव’ नुकताच करंबेळे तर्फे देवळे गोताडवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी मोफत व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर, महिलांसाठी योगा मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात, रत्नागिरी जिल्ह्यात समाजकार्यात आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ मान्यवरांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या महोत्सवात आयोजकांनी एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला. कार्यक्रमाचे आयोजक स्वतः मंचावर न बसता, त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रमुख पाहुण्यांना मंचावर सन्मानाने स्थान दिले. त्यांच्या या विनम्र कृतीने उपस्थित सर्वजण भारावून गेले आणि या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले. उद्योजक, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, कलाकार, खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव यावेळी करण्यात आला.

रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये निखिल सकपाळ, वसंत मेस्त्री, रमेश मेस्त्री, तुषार नेवरेकर, प्रदीप चंदरकर, मकबूल मुकादम, हरिश्चंद्र वेदरे, हरिश्चंद्र बंडबे, सुशांत मोहिते, अक्षय बारगुडे, सुरज धावडे, संदीप सावंत, संदीप पावसकर, डॉ. आनंद आंबेकर, सचिन काळे, सुनील बेंडखळे, मिथिलेश देसाई, समीर शिगवण, अमृता गोताड, जगन्नाथ दुदम, तेजस बोरघरे, ग्रीष्मा कांगणे, विलास रहाटे, सुरेश दसम,दयानंद चिंचवलकर, जयराम ठोंबरे, डॉ. सागर फटकरे, डॉ. विनय ढवळ आणि अशोक सावंत यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त जल फाउंडेशन आणि संगमरत्न फाउंडेशन या संस्थांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला तालुका कृषी अधिकारी विनोद हेडगे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, रिलस्टार संदीप पावसकर, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेते सचिन काळे, सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर, पुढारी न्यूज चॅनेलचे वृत्तनिवेदक तेजस बोरघरे, प्रा. डॉ. आनंद आंबेकर, गावकर राजेश गोताड, माजी पोलीस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, ढवळ गुरुजी आणि बुधाजी खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड, मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ. मंगेश कांगणे, अमित गमरे, नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव आणि मुझम्मील काझी यांनी विशेष परिश्रम घेतले. या महोत्सवाला स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Total Visitor Counter

3199329
Share This Article