खेड: तालुक्यातील मोरवंडे-पिंपळवाडी येथील एका 27 वर्षीय तरुणाने नोकरी नसल्याच्या मानसिक तणावातून अत्यंत टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या तरुणाने दारूच्या नशेत रेटॉल नावाचे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. संकेत रवींद्र कदम असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने खेड परिसरात शोक व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, संकेत कदम याने 12 सप्टेंबर रोजी बसथांब्याजवळ दारूच्या नशेत असताना हे विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्याने स्वतःच उपचारांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि उपचारासाठी दाखल झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्याचे प्रकृती पाहिली आणि ती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचे भाऊ राहुल रवींद्र कदम यांना याबाबत कळवले. संकेत याची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्याला तातडीने अधिक उपचारांसाठी मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात हलवण्यात आले.
या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही घटना ठाणे-मुंबई-भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांनी याबाबत येथील पोलीस स्थानकात कळवले. त्यानुसार, खेड पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. बेरोजगारीतून आलेल्या मानसिक तणावातून संकेत याने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.