रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मडगाव–सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. खेड ते पनवेल दरम्यान हा प्रकार घडल्याने गाडी सुमारे साडेतीन तास रखडली. अखेर दुसरे इंजिन जोडण्यात आल्यानंतर ही एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता ही गाडी सीएसएमटी स्थानकात पोहोचली.
२०११२ क्रमांकाची मडगाव–सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस आधीच दीड तास उशिराने धावत होती. खेड स्थानकातही ही गाडी सुमारे अर्धा तास उशिराने दाखल झाली. स्थानकातून पुढे रवाना झाल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोको पायलटच्या निदर्शनास आले. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
जवळच्या स्थानकातून दुसरे इंजिन मागवून ते जोडण्यात आल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. त्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या इंजिन बिघाडाचा फटका मंगळवारी मांडवी एक्सप्रेसलाही बसला.
कोकणात येणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रवाशांना विविध स्थानकांवर तासन्तास थांबावे लागले. १०१०३ क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस मंगळवारी पहाटे साडेबारा वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटल्याने प्रवाशांचा मोठा मनस्ताप झाला. अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.





