रायगड : देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होत असताना मुंबई–गोवा महामार्गाचे काम मात्र आजही रखडलेलेच आहे. गेली दोन दशके सुरू असलेले हे काम अद्याप पूर्णत्वास गेले नसून, महामार्गावरील काँक्रीट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीती आहे. प्रवासाच्या दृष्टीने हा महामार्ग आजही असुरक्षितच असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे.
सन २०२५ या वर्षात मुंबई–गोवा महामार्गावर सुमारे ३४२ अपघातांची नोंद झाली असून नोव्हेंबरअखेरपर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सरकारी नोंदीतील असून, अनेक किरकोळ व गंभीर अपघात नोंदच न झाल्याने प्रत्यक्ष अपघातांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे सांगितले जाते.
डिसेंबरअखेरपर्यंत ही संख्या जवळपास ५०० च्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम गेली दोन दशके सुरू असल्याने हा प्रकल्प जणू “अपूर्णतेचे प्रतीक” ठरत आहे. संतापजनक परिस्थिती असूनही कोकणवासीयांनी विलक्षण संयम दाखवला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कोकणातील नागरिक अपघात, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि गणेशोत्सव काळात पर्यायी मार्ग शोधण्याचा मनस्ताप सहन करत आहेत. शासनाकडून महामार्ग पूर्ण झाल्याचे दावे केले जात असले तरी प्रवासी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महामार्ग अजूनही धोकादायकच आहे. या महामार्गाने आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी घेतले असून परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
पनवेल–पळस्पे येथून महामार्गाचा पहिला टप्पा, इंदापूर–कशेडी आणि पुढे कशेडी–सावंतवाडीपर्यंतचे काम गेली दोन दशके सुरूच आहे. तांत्रिक अडचणी न सोडवता काम सुरू केल्याने जागोजागी अडथळे निर्माण झाले. सर्व्हेक्षणाच्या वेळी या अडचणी लक्षात का आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चुकीच्या नियोजनाचा फटका मात्र कोकणवासीयांना बसत आहे. कोकण वगळता इतर भागातील महामार्ग वेळेत पूर्ण होत असताना मुंबई–गोवा महामार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याची भावना तीव्र होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर दौरे करून आश्वासनांचे पाऊस पडतात, मात्र प्रत्यक्षात कामाची गती आणि गुणवत्ता बदललेली दिसत नाही.
पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत महामार्गाचे काम काँक्रीटमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी दशकभरानंतरही हे काम अपूर्ण आहे. पळस्पे फाट्यापासून इंदापूरपर्यंतचा पहिला टप्पा आधी डांबरीकरणात करण्यात आला होता; मात्र निकृष्ट दर्जामुळे तो पुन्हा काँक्रीटमध्ये करण्यात आला. नागोठणे, कोलाड तसेच इंदापूर–माणगाव परिसरात आजही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. काँक्रीटचा रस्ता समतोल नसल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पूल आणि लहान मोऱ्या मूळ रस्त्याच्या पातळीशी जुळत नसल्याने वाहने आदळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी तडे गेले असून खड्डे पडू लागले आहेत. परिणामी अल्पावधीतच दुरुस्तीची कामे सुरू करण्याची वेळ महामार्ग विभागावर आली आहे.
पळस्पे ते पोलादपूरदरम्यान अनेक ठिकाणी अव्यवस्थित आणि नियमबाह्य गतिरोधक उभारण्यात आले आहेत. वेगात असलेली वाहने या गतिरोधकांवर आदळत असून वाहनांच्या खालच्या भागाचे मोठे नुकसान होत आहे. कर्नाळा घाट आणि इतर खिंडींमध्ये रंबलिंग प्रकारचे गतिरोधक टाकण्यात आल्याने उतारावर वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. असमतोल रस्त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकून रस्ता समतल करण्याची नामुष्कीही विभागावर आली आहे. महामार्गाच्या मध्यभागी आवश्यक असलेले वृक्षारोपण अद्याप न झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
या महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी एका तरुणाने करून त्याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवली आहे. असमतोल रस्ते, अचानक देण्यात आलेले पर्यायी मार्ग, धोकादायक स्पॉट आणि असुरक्षित गतिरोधक यांमुळे मुंबई–गोवा महामार्गावरील प्रवास आजही जीवघेणाच असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्याच्या निकृष्ट काँक्रीट रस्त्याऐवजी संपूर्णपणे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई–गोवा महामार्ग २०२५ मध्ये ३४२ अपघात, ११० जणांचा मृत्यू; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न







