तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील मूर कोलतेवाडी येथील महत्त्वाच्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या अर्धवट कामामुळे शाळकरी मुले आणि स्थानिक ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सततच्या पावसामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने काजीर्डा, कोळंब आणि मूर या गावांचा संपर्क तुटला आहे. या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
मूर कोलतेवाडी येथे असलेला जुना पूल हा काजीर्डा, कोळंब आणि मूर येथील काही वाड्यांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. शाळकरी मुले दररोज याच पुलावरून ये-जा करतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून नवीन पुलाचे काम सुरू असूनही ते पूर्ण झालेले नाही. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि पावसाने जुना पूलही वाहतुकीसाठी बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा, महाविद्यालयात जाणे त्यांच्यासाठी एक मोठी कसरत बनली आहे. याव्यतिरिक्त, अनेक ग्रामस्थांची शेतीची कामेही थांबली आहेत, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे.
ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप
या पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांच्या या गंभीर मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राजापूर तालुका धनगर समाजाचे सचिव आणि पाचल पंचक्रोशी धनगर समाजाचे सल्लागार संजय झोरे यांनी स्थानिक आमदारांनाही या परिस्थितीची कल्पना दिली आहे. तरीही कामात कोणताही बदल झालेला नाही.
तीव्र आंदोलनाचा इशारा
कामाचा दर्जा निकृष्ट असूनही ते पूर्ण झालेले नसल्याने संजय झोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मूर येथील ग्रामस्थ साईराज कोलते यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. “जर येत्या चार दिवसांत पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली नाही, तर आम्ही सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष घालून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल.