GRAMIN SEARCH BANNER

राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथे ट्रायल दरम्यान बोलेरो पिकअप पलटी; एक जण गंभीर जखमी

Gramin Varta
419 Views

राजापूर: मुंबईहून कणकवलीच्या दिशेने एक हजार किलोमीटरच्या चाचणीसाठी (ट्रायल) चाललेली नवीन कोरी बोलेरो पिकअप गाडी राजापूर तालुक्यातील उन्हाळे कुंभारवाडी येथे पलटी झाली. चंद्रकांत पवार यांच्या घरासमोर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात गाडीचा क्लीनर गंभीर जखमी झाला असून, चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोघांवरही सध्या कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या नवीन उत्पादित गाड्यांची चाचणी घेतली जाते. या प्रक्रियेचा भाग म्हणून मुंबईहून ही गाडी कणकवलीकडे जात होती. उन्हाळे येथील चंद्रकांत पवार यांच्या घराजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी रस्त्यावरच पलटी झाली. या भीषण अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपल्या घरासमोर गाडी पलटी झाल्याचे लक्षात येताच चंद्रकांत पवार यांनी तातडीने याची माहिती राजापूर पोलीस स्थानकात दिली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत या अपघाताची अधिकृत नोंद पोलीस दप्तरी झाली नसल्याने, जखमींची नावे समजू शकली नाहीत.

Total Visitor Counter

3366873
Share This Article