संगमेश्वर (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली सरपंच आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमताने तब्बल ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी सखोल चौकशी करून आपला अहवाल जिल्हा परिषद रत्नागिरीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (ग्रामपंचायत) सादर केला आहे. या अहवालात संबंधित सरपंच आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अपहाराची ही रक्कम प्रत्येकी ५० टक्के याप्रमाणे वसूल करण्यात यावी, असा स्पष्ट अभिप्राय देण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कळंबुशी येथील रहिवासी विजय तुकाराम चव्हाण यांनी याप्रकरणी संगमेश्वर पंचायत समितीकडे तक्रार करत कामांच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडेही या घोटाळ्याबाबत दाद मागण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रामुख्याने बौद्धवाडी येथे पाखाडी बांधणे, जुन्या पाखाडीची दुरुस्ती करणे अशी कागदोपत्री दाखवलेली सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची कामे प्रत्यक्षात जागेवर अस्तित्वातच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
याशिवाय संगणक प्रिंटर खरेदी व दुरुस्ती, स्ट्रीट लाईट ब्रॅकेट बसवणे, सौर ऊर्जा उपकरणे, शेवट करांडा येथील पाखाडी काम, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा कुंडी वाटप, प्लास्टिक साठवण केज, आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडी साहित्य पुरवठा, ग्रामपंचायत इमारतीचे फर्निचर आणि लाईट फिटिंग अशा विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांच्या या एकूण घोटाळ्याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईची शिफारस केली असून, ही रक्कम तत्काळ सरकारी तिजोरीत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट कारभाराला चाप बसणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.






