GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भूस्खलनाचे हॉटस्पॉट; रस्ता रुंदीकरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या डोंगरांच्या बेसुमार कटाईमुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाचे गंभीर ‘हॉटस्पॉट’ तयार झाले असून, पावसाळ्यात हा महामार्ग धोकादायक ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केर्ले ते वाघबीळ दरम्यान उड्डाणपुलासाठी डोंगरकडे उभे कापण्यात आले आहेत, तर भाडळे खिंडीत चढाव कमी करण्यासाठी डोंगर १०० ते १२५ फुटांपर्यंत कापल्याने येथील डोंगरकडे अत्यंत कमकुवत झाले आहेत.

पावसाचे पाणी आणि अवजड वाहतुकीच्या हादर्‍यांमुळे हे मातीचे ढिगारे व दगड कधीही रस्त्यावर कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेषतः मार्लेश्वर ते पाली दरम्यानचा भाग मुळातच भुसभुशीत आणि मातीचा असल्याने या परिसरात भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असून, यामुळे भविष्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारी वाहतूक वारंवार खंडित होऊन पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागण्याची चिन्हे आहेत. वाघबीळ किंवा भाडळे खिंडीत दरडी कोसळल्यास संपूर्ण दळणवळण कोलमडून पडणार असल्याने, प्रशासनाने या संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची वेळीच दखल घेऊन संरक्षक भिंती किंवा अन्य ठोस उपाययोजना तातडीने करण्याची मागणी आता जोर धरत आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या अपघाताची मालिका सुरू होऊन प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांकडून दिला जात आहे.

Total Visitor Counter

3348080
Share This Article