GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे येथे इमारतीच्या छतावरून पडून जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

जयगड: गणपतीपुळे-मालगुंड परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना छतावरून घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय मजुराचा कर्नाटक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नंदकुमार अंजुनाथ देसाई (रा. खानापूर, जि. बेळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. नंदकुमार हे गणपतीपुळे येथे भाई गांगण यांच्या मालकीच्या बांधकामावर गवंडीकाम करत होते. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते छतावरून खाली पडले.

या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी त्यांना कर्नाटक राज्यातील हुबळी येथील के.आय.एम.एस. रुग्णालयात दाखल केले. तिथे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती; मात्र २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८:४० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485115
Share This Article