GRAMIN SEARCH BANNER

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन; पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Gramin Varta
88 Views

रत्नागिरी : कोकणातील शेती आणि पावसाचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा’ला सोमवार, ८ जूनपासून अधिकृत सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाचे वेध लागलेले असतानाच, मुंबई हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट‘ जारी केला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारसह मंगळवार, ९ जून आणि बुधवार, १० जून या कालावधीत जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळी ६ नंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस बरसला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना जारी केल्या असून, नागरिकांनी आणि विशेषतः शेतात काम करणाऱ्या शेतकरी बांधवांनी विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

मृग नक्षत्राच्या पहिल्या तीन दिवसांच्या या वादळी इशाऱ्यानंतर ११ आणि १२ जून रोजी हवामानात सुधारणा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या दोन दिवसांसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नसून पावसाचा जोर ओसरून हवामान सामान्य होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृगाच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आता चांगलाच वेग येणार आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने काहीशी संथ गती घेतली असली, तरी आता जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ७ जून रोजी दिवसभरात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती, मात्र लांजा, राजापूर आणि चिपळूण या दक्षिण व मध्य रत्नागिरीच्या भागात काही ठिकाणी हलक्या ते दमदार सरी बरसल्या. ८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३.०३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड, दापोली, खेड आणि रत्नागिरी तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. ६ जूनचा कोरडा दिवस उलटल्यानंतर ७ जून रोजी मात्र पावसाने जिल्ह्याला चांगली सलामी दिली, ज्यामध्ये राजापूर तालुक्यात सर्वाधिक ५३.३० मि.मी. तर गुहागरमध्ये १७.३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आता मृगाच्या मुहूर्तावर पाऊस वेळेत दाखल झाल्याने बळीराजा सुखावला असून, आगामी काळात मान्सूनचा प्रवास कसा राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3483538
Share This Article