GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणातील महिलेला मिरजमध्ये लुटले, पोलिस असल्याची बतावणी करून दागिन्यावर डल्ला

चिपळूण :  येथील 71 वर्षीय रुकैय्या इब्राहिम साबळे या महिलेला मिरजमधील मोहम्मदिया मशीदजवळ एका इसमाने पोलिस असल्याचे भासवून लुटले. तोतया पोलिसाने “पुढे अपघात झाला असून वरिष्ठ चौकशी करत आहेत,” असे सांगून त्यांच्या हातातील 48 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आपल्याकडे घेतल्या. बांगड्या कागदात गुंडाळून देतो, असे सांगितले. मात्र, त्याने हातचलाखीने बनावट बांगड्या परत दिल्या आणि घटनास्थळावरून पसार झाला.

याबाबत माहिती अशी, रुकैय्या साबळे या मिरज शहरातील मोहम्मदिया मशिदीशेजारून निघाल्या होत्या. त्यावेळी 40 ते 50 वयोगटातील एका तोतया पोलिसाने त्यांना गाठले. ‘पुढे अपघात झाला आहे. आमचे साहेब पुढे चौकशी करीत आहेत. ते तुम्हाला विचारतील. त्यामुळे तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या, मी ते कागदात बांधून देतो’, असे सांगितले.

रुकैय्या यांनी सोन्याच्या बांगड्या तोतया पोलिसाकडे काढून दिल्या. त्यानंतर संबंधिताने हातचलाखी करून बनावट बांगड्या कागदात गुंडाळून दिल्या. त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येतात रुकैय्या साबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2474805
Share This Article