GRAMIN SEARCH BANNER

महात्मा फुले-आयुष्मान योजनेत हृदयविकार उपचार पुन्हा समाविष्ट करा : शौकत मुकादम

Gramin Varta
73 Views

चिपळूण : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे नामकरण करून ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आली असली, तरी नव्या बदलांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपचार पद्धती वगळण्यात आल्याने संबंधित रुग्ण व सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे हृदयविकारावरील उपचार पुन्हा या योजनेत समाविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मुकादम यांनी म्हटले आहे की, हृदयविकारामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः तरुण वयात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामागील कारणे पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे हा आजार गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशा परिस्थितीत हृदयविकाराच्या झटक्यावर होणारा महागडा उपचार सर्वसामान्य व गरीब रुग्णांना परवडणारा नसल्याने शासनाच्या आरोग्य योजनाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतात.

मात्र, अशा गंभीर आणि जीवघेण्या आजारावरील उपचार योजनेतून वगळणे हे अतिशय दुर्दैवी व चुकीचे पाऊल असल्याचे मुकादम यांनी नमूद केले. हृदयविकारासह मूतखडा, डोळ्यांचे आजार यांसारख्या महागड्या उपचारांचाही या योजनेत समावेश असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“एखादी आरोग्य योजना राबवूनही त्याचा प्रत्यक्ष फायदा गोरगरीब रुग्णांना होत नसेल, तर अशा योजनेचा काय उपयोग? केवळ नाव बदलून आणि दिखाऊ घोषणा करून चालणार नाही. लोकांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे, मूलभूत आणि आवश्यक आजार योजनेत समाविष्ट झाले पाहिजेत,” असेही मुकादम यांनी ठामपणे सांगितले.

शासनाने या योजनेचा त्वरित फेरविचार करून हृदयविकारासह इतर गंभीर व खर्चिक आजारांवरील उपचार पुन्हा उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3376918
Share This Article