GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे लोट; कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला

Gramin Varta
109 Views

रत्नागिरी: कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या प्रवाशांना भीषण धुळीचा सामना करावा लागत असून, जुळेवाडी खिंड, मलकापूर ते आंबा दरम्यान कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असले, तरी या जीवघेण्या धुळीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत असून परिसरातील गावांमध्ये श्वसनाचे विकार बळावल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या आंबा ते मलकापूर दरम्यान जोरात सुरू असून यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि मातीचे भराव टाकले जात आहेत. मात्र, अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही माती हवेत उडून परिसरात धुळीचे लोट निर्माण होत आहेत. या परिस्थितीमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना श्वास घेणे कठीण झाले असून, समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताची भीतीही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. रस्त्यालगत असलेल्या घरांवर, झाडांवर आणि स्थानिक दुकानांवर धुळीचे जाड थर साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या गंभीर समस्येवर उपाय म्हणून कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेने रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणे अत्यंत आवश्यक असताना, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. हवामानाचा लहरीपणा आणि त्यात भर म्हणून सुरू असलेल्या या धुळीच्या त्रासामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांना या जाचातून मुक्त करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3372028
Share This Article