मुंबई: येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकू. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच आपण एकत्रितच लढवत आहोत. अर्थातच ज्याठिकाणी काही अडचणी आहेत, तिथे आमच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायचे आहेत.
ज्याठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक होणार नाहीत, त्याठिकाणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही. कारण आपण जर सत्तेत एकत्र आहोत. त्यामुळे आपल्याला मैत्रीपूर्ण लढती करायच्या आहेत. आपल्याला या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवायचे आहे, असे निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्ध्याच्या सेवाग्राम येथील चरखा गृहात आज भाजपची विदर्भ स्तरीय आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत. सोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 19 जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांसह 750 पदाधिकारी या बैठकीला हजर होते.
फडणवीस पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपण सर्व रेकॉर्ड मोडले. मी अत्यंत समाधानी आहे. 137 जागा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलो. 35 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये इतक्या जागा कोणालाही जिंकता आल्या नाही, हा रेकॉर्ड आपण केला. यापूर्वी महाराष्ट्राचा रेकॉर्ड 122 जागेचा होता तोही आपण तोडला. या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार आहोत. हे सरकार जेव्हा पाच वर्षे पूर्ण करेल, तेव्हा महाराष्ट्राचे पूर्ण कायापालट झालेलं असेल. आपले विरोधक आपल्याशी विकासाची स्पर्धाच करू शकत नाही. ते रोज नवनवीन एकप्रकारे नरेटिव्ह पसरवत असतात. ते विकासाची चर्चाच होऊ देत नाही. वरून इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट जनसुरक्षा कायद्याबाबत बोलू लागले आहेत. ज्यांना भारताचे संविधान मान्य नाही, अराजकतावादी विचारसरणी पोहचवायची आहे. सर्वांना एकमेकांच्या विरोधात लढवायला लावायचं, असे अर्बन नक्षल काम करत आहेत, म्हणून यांच्याविरोधात कार्यवाही करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र हा माओवाद्यांचे सेंटर झाले आहे. त्यासाठी हा कायदा आणला. हा कायदा संस्थेवर बंदी घालण्याचा आहे. पण थेट कोणाला अटक करता येणार नाही. या विषयी आम्ही ओपन डिबेट करण्यास तयार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसतशी नवनवीन नरेटिव्ह येईल. विरोधकांकडून जाणीवपूर्वक हे वाद तयार केले आहेत, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आपण ही निवडणूक महायुती म्हणूनच लढत आहोत. अर्थातच ज्याठिकाणी काही अडचणी आहेत तिथे आमच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायचे आहेत. ज्याठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक होणार नाहीत त्याठिकाणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही. कारण आपण जर सत्तेत एकत्र आहोत त्यामुळे आपल्याला मैत्रिपूर्ण लढती करायच्या आहेत. आपल्याला या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवायचे आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रितच लढवायच्या – मुख्यमंत्री
