…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील…सरपंच बांदकर यांचा प्रशासनाला थेट इशारा!
राजन लाड/ जैतापूर
राजापूर तालुक्यातील नाटेच्या भराडीन वाडी ते बाणेवाडी दरम्यान असलेला साकव अर्धवट तुटल्यामुळे दोन्ही वाड्यांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती गंभीर आणि धोकादायक ठरत आहे.
या साकवाच्या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता यांना वेळोवेळी कळवले असतानाही प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत ग्रामपंचायत नाटेचे सरपंच संदीप बांदकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशारा सरपंच संदीप बांदकर यांनी दिला.
स्थानिक ग्रामस्थांनीही संतप्त प्रतिक्रिया देत नवीन साकवाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. बांधकाम विभाग व जिल्हा परिषद उपअभियंता यांनी आता तरी जागे व्हावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
नाटे भराडीन वाडीतील साकव तुटला; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा संपर्क तुटला
