कडवई :संगमेश्वर तालुक्यातील भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कडवई येथे एन.सी.सी.विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या शिबिरात मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शिका प्रा. सानिका भालेकर यांनी विद्यार्थ्यांना ‘ प्रयत्नवादी ‘ होण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमात कडवई गावचा सुपुत्र राज घोसाळकर याची दिल्ली येथे झालेल्या एन.सी.सी कॅम्पसाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एन.सी.सी.ऑफिसर प्रा.सानिका भालेकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअर करावे. एकदा आवड निश्चित झाली की त्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तींना भेटून त्या क्षेत्राची सविस्तर माहिती घ्यावी.एकदा का ते करिअर करायचे ठरविले की त्यात यश येईपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत.प्रतिकूल परिस्थितीतच व्यक्तीचा खरा कस लागत असतो.आपल्याला अनुकूलता असूनही यश मिळत नाही याचे कारण आपली नकारात्मता हेच आहे. एन.सी.सी. चा उद्देश देशाचा जबाबदार नागरिक घडविणे हाच आहे. एन. सी.सी.मध्ये जाऊन सगळ्यांनाच संरक्षण क्षेत्रात करिअर करता येईल असे नाही, तरी त्यातून व्यक्तिमत्व विकास खऱ्या अर्थाने होतो ; जो आपल्याला आपल्या भविष्यकालीन वाटचालीसाठी उपयोगी पडतो.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंके,समीर भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात दिल्ली येथे झालेल्या कॅम्पसाठी निवड झाल्याबद्दल साहिल शिगवण याचाही सत्कार करण्यात आला तसेच एन.सी.सी.कॅडेट प्राची पर्शराम व सानिका धुळप यांनाही सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद कडवईकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यदेवी चौगुले,सोमनाथ कोष्टी,संजय घोसाळकर,अरविंद सुर्वे यांनी मेहनत घेतली.






