खेड: महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने बळ देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघ व खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ व १३ एप्रिल रोजी भव्य ‘नारी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात महिलांचा जल्लोष, विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकीतून गरजू महिलांना मदतीचा हात देणारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील महिलांना एकत्र आणून त्यांच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांच्या कलागुणांना मिळणारी संधी असून, यात महिला भजन मंडळांचे भजन, नृत्य, लावणी आणि पारंपरिक लोककलांचा जागर होणार आहे.
लोकपरंपरेचा वारसा जपणारी महिला मंडळे आणि आधुनिक कलेत प्रावीण्य मिळवलेल्या तरुणींना या निमित्ताने आपली कला सादर करता येणार आहे. सहभागी होणाऱ्या महिला कलावंतांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पत्रकार संघाच्या वतीने त्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. केवळ कलाच नव्हे, तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नाट्यगृह परिसरात सुमारे २० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे महिला बचतगट आणि स्थानिक महिलांना आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्याची आणि आर्थिक उन्नती साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
महोत्सवाचे विशेष सामाजिक अंग म्हणजे यादरम्यान पाच गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या या महिलांना शिलाई मशिनच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे. या भव्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, संयोजन समिती प्रमुख उत्तमकुमार जैन, उपाध्यक्ष इक्बाल जमादार, श्रीकांत चाळके, सदानंद जंगम, सचिव किशोर साळवी, कार्यक्रमप्रमुख अश्विनी वडके आणि अन्य सदस्य परिश्रम घेत आहेत. खेडमधील या आगळ्यावेगळ्या नारी महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे तालुक्यात महिलांच्या कर्तृत्वाचा आणि आदराचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






