GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू; वरवेली ग्रामस्थ आक्रमक, रुग्णालयात ठिय्या

Gramin Varta
464 Views

गुहागर : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला अनेक तास उपचाराविना ताटकळत ठेवण्यात आल्याने प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडली. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा हलगर्जी व निष्काळजीपणा उघडकीस आला असून, नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गुहागर तालुक्यातील वरवेली येथील शिंदे आडनावाच्या महिलेला मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजता प्रसूतीसाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी ८ वाजेपर्यंत प्रसूती न झाल्याने नातेवाईकांनी तिला अन्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राहुल हजारे यांनी ‘नॉर्मल प्रसूती होईल’ असे सांगत तिला अन्यत्र नेण्यास नकार दिला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तसेच, प्रसूतीपूर्व आवश्यक असलेली सोनोग्राफी न पाहताच उपचार सुरू ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली; मात्र जन्मानंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वरवेली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी संबंधित डॉक्टरांना जाब विचारत, इतक्या वेळ महिला रुग्णाला उपचाराविना का ठेवले, असा सवाल उपस्थित केला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने आपली चूक मान्य केल्याचेही सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366866
Share This Article