GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच व्यक्ती बेपत्ता

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पाच व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. मिरकरवाडा येथील आसिफ फकिर महम्मद होडेकर (वय ५४) हे सप्टेंबर २०१९ पासून बेपत्ता असून सावळा रंग, मध्यम बांधा आणि ५ फूट ७ इंच उंची असलेली ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मूळ ओडीसा येथील रहिवासी असलेले बारीका शुकरु दास (वय ४६) हे गेल्या ऑक्टोबर महिन्यात मिऱ्या बंदर परिसरातील समुद्राच्या पाण्यातून बेपत्ता झाले आहेत. त्यांची उंची ५ फूट २ इंच असून अंगात काळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट आणि हाफ पँट असल्याचे वर्णनात नमूद केले आहे.

शहरातील भाटीमिऱ्या येथील कुणाल चंद्रकांत नेवरेकर (वय ३२) हा तरुण ऑगस्ट २०१८ पासून बेपत्ता आहे. ५ फूट ६ इंच उंची, गोरा रंग आणि सडपातळ बांधा असलेला हा युवक मानसिक रुग्ण असून तो १५ वी पर्यंत शिकलेला आहे. गावखडी येथून काव्या शुभम गुरव (वय २६) ही विवाहिता ३१ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असून तिच्या मानेवर व हातावर ‘शुभम’ असे नाव गोंदलेले आहे. तिने पिवळ्या रंगाचा टॉप आणि पांढरी लेगीज परिधान केली असून ती मराठी, गुजराती व हिंदी भाषा बोलते. यासोबतच संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील रुपाली राजेंद्र मयेकर (वय ४५) या जानेवारी २०१९ पासून बेपत्ता असून त्यांनी चॉकलेटी साडी आणि निळ्या रंगाचे स्वेटर घातलेले आहे. या पाचही व्यक्तींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ रत्नागिरी शहर, पूर्णगड सागरी किंवा संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3485445
Share This Article