GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मासेमारी बंदी कालावधी १० जून ते १५ ऑगस्ट करण्याची मागणी

Gramin Varta
96 Views

रत्नागिरी: शासनाने मासेमारी बंदी कालावधीत केलेल्या बदलांमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा बदल रद्द करून मासेमारी बंदीचा कालावधी पूर्वीप्रमाणेच १० जून ते १५ ऑगस्ट असा करावा, अशी मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेने केली आहे.

या संदर्भातील निवेदन सहाय्यक मत्स्य आयुक्तांना संघटनेचे अध्यक्ष रणजित मनोहर भाटकर यांनी सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी शासनाच्या नियमाप्रमाणे मासेमारी बंदीचा कालावधी १० जून ते १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा होता. हा कालावधी मत्स्योत्पादनासाठी आणि मच्छीमारांसाठी अत्यंत योग्य होता; मात्र, शासनाने यामध्ये बदल करून बंदीचा कालावधी १ ऑगस्टपर्यंत केल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे यामुळे मच्छीमार आधीच हवालदिल झाले आहेत. या नव्या नियमांमुळे नौकांवर काम करणारे खलाशी व तांडेल यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पगार देणेही मालकांना अशक्य होत आहे. सध्याची ही गंभीर परिस्थिती पाहता चालू वर्षी मच्छीमारांना १५ जूनपर्यंत मासेमारी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती श्री. भाटकर यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3485596
Share This Article