GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयाचा कोल्हापूर विभागात डंका; ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पटकावला प्रथम क्रमांक

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा ३ या अभियानात कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावून सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत खासगी शाळा विभागातून विद्यालयाने हे यश संपादन केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील उत्कृष्ट शाळांमधून सावर्डे विद्यालयाची सर्वोत्तम शाळा म्हणून निवड झाली असून, या विजयामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हे अभियान ३ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. यामध्ये विद्यालयाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. पायाभूत सोयीसुविधा, शासन ध्येय-धोरणांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूक या त्रिसूत्रीवर आधारित पीपीटी, पीडीएफ फाईल्स आणि प्रत्यक्ष शाळा तपासणी अशा विविध टप्प्यांवर विद्यालयाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. यापूर्वी या विद्यालयाने पहिल्या वर्षी विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते, तर सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. आता तिसऱ्या टप्प्यात थेट विभागात अव्वल येत २१ लाख रुपयांच्या बक्षिसावर मोहोर उमटवून विद्यालयाने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे.

या यशामागे चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी, रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, पालक आणि शिक्षणप्रेमींचे मोठे सहकार्य लाभले आहे. विद्यालयाची प्रेरणादायी इमारत, सुव्यवस्थित पायाभूत सुविधा आणि राबवले जाणारे नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यामुळे हे यश सुकर झाले. या घवघवीत यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. सावर्डे विद्यालयाने मिळवलेल्या या यशामुळे इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.

Total Visitor Counter

3486458
Share This Article