GRAMIN SEARCH BANNER

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाची झळ देवरूखात; व्यावसायिक गँस सिलिंडर पुरवठा बंदमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत

Gramin Varta
3 Views

देवरूख क्रांती व्यापारी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर

देवरूख-इराण-अमेरिका- इस्त्रायल युद्धाची झळ संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमध्ये बसू लागली असून व्यावसायिक गँस सिलिंडर पुरवठा बंदमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. देवरूखातील क्रांती व्यापारी संघटनेतर्फे तहसीलदारांना गुरूवारी निवेदन सादर करण्यात आले असून तहसीलदार सौ. अमृता साबळे यांची भेट घेऊन संघटनेतर्फे हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या आहेत.अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्यानंतर देवरूख येथे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व खाद्य व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

९०% हॉटेल, चायनीज, वडापाव, मिसळ नाष्टा सेंटर, चहा विक्रेते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत फार गंभीर परिस्थिती उद्भवली असल्याने या पार्श्वभूमीवर क्रांती व्यापारी संघटना, देवरुख यांच्या वतीने तहसीलदार मॅडम यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल, चायनीज सेंटर, नाष्टा सेंटर, वडापाव, मिसळ तसेच चहा विक्रेते यांचे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी व कामगारांवरही उपासमारीची वेळ येऊ शकते.

तसेच प्रवासी, पर्यटक आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांना हॉटेल सेवांचा मोठा आधार असतो, त्यामुळे ही सेवा बंद राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणी निर्माण होत आहेत. यावेळी तहसीलदार मॅडम यांच्यासमोर व्यावसायिकांनी आपली व्यथा मांडत तातडीने पर्यायी मार्ग काढण्याची मागणी केली. यावर तहसीलदार मॅडम यांनी या विषयाची दखल घेत “आपले म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून या प्रश्नावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू” असे आश्वासन दिले. दरम्यान, या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा अशी अपेक्षा देवरुख परिसरातील हॉटेल व खाद्य व्यवसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3163214
Share This Article