लालपरी ठरली ‘प्राणवाहिनी’ : संगमेश्वरमध्ये एसटी कर्मचारी, प्रवाशांनी वाचवला चिमुरडीचा जीव

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर शहर / एजाज पटेल: एसटी महामंडळाचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य केवळ बसच्या फलकावर लिहिलेले शब्द नसतात, तर ते अनेकांच्या मनात आणि कृतीतही जिवंत असते. संगमेश्वरमध्ये घडलेल्या एका प्रसंगाने याची जिवंत साक्ष दिली. धावत्या एसटी बसमध्ये अचानक प्रकृती बिघडलेल्या नऊ वर्षांच्या चिमुरडीसाठी चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक विश्वास फडके आणि बसमधील प्रवासी अक्षरशः देवदूत ठरले. त्यांच्या तत्परतेमुळे त्या चिमुरडीला वेळेवर उपचार मिळाले आणि माणुसकीचा स्पर्श अनुभवायला मिळाला.संध्याकाळच्या सुमारास रत्नागिरी-चिपळूण ही एसटी बस संगमेश्वरमधून मार्गस्थ झाली होती. बसमध्ये मंडणगडला जाणारे एक गरीब कुटुंब आपल्या नऊ-दहा वर्षांच्या मुलीसह प्रवास करत होते. प्रवास सुरू असतानाच अचानक त्या मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला आकडी येऊ लागली. चिमुरडीची ती वेदनादायक अवस्था पाहून तिचे आई-वडील अक्षरशः हतबल झाले. बसमध्ये एकच खळबळ उडाली.मात्र अशा प्रसंगी प्रवाशांनीही मोठी संवेदनशीलता दाखवली. कुणी पाणी दिले, कुणी मुलीच्या आई-वडिलांना धीर दिला. “घाबरू नका, दवाखाना जवळ आहे,” असे म्हणत प्रवाशांनी त्या कुटुंबाला आधार दिला. स्वतःच्या प्रवासाचा विलंब होईल याचा विचार न करता सर्वांनी चालक-वाहकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक-वाहकांनी क्षणाचाही विलंब न करता बस थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने वळवली. प्रवाशांनी भरलेली ती लालपरी त्या क्षणी जणू त्या चिमुरडीसाठी ‘प्राणवाहिनी’ ठरली. काही मिनिटांतच बस रुग्णालयात पोहोचली आणि मुलीला तातडीने उपचार मिळाले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे वाहतूक नियंत्रक विश्वास फडके तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. केवळ अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडण्यापेक्षा त्यांनी त्या गरीब पालकांना मायेचा आधार दिला. डॉक्टरांशी चर्चा करून मुलीच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि उपचार व्यवस्थित सुरू असल्याची खातरजमा केली.पालकांची अडचण ओळखून विश्वास फडके यांनी त्यांना धीर देत, “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर रात्रीच्या वेळी त्या कुटुंबाला अन्नाची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली.नोकरीची जबाबदारी तर अनेकजण पार पाडतात; मात्र संकटात सापडलेल्या अनोळखी प्रवाशासाठी धावून जाणे, त्याला आधार देणे आणि माणुसकी जपणे हेच खरे मोठेपण असते. संगमेश्वरमध्ये घडलेला हा प्रसंग एसटी कर्मचारी, प्रवासी आणि विश्वास फडके यांच्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरला असून जिल्हाभरातून त्यांच्या या माणुसकीचे कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *