दापोली – दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेतून मूळचे तेलंगणा राज्यातील आणि सध्या दापोली येथे वास्तव्यास असलेले ५९ वर्षीय दासु चिन्नाचन्नप्पा गादम हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा शेखर दासु गादम यांनी हर्णे पोलीस ठाण्यात दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दासु चिन्नाचन्नप्पा गादम हे २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेनऊ ते पहाटे तीनच्या दरम्यान हर्णे बाजारपेठेतून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. त्यांचा मुलगा शेखर गादम यांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडेही त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेही मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन असे: त्यांचे नाव दासु चिन्नाचन्नप्पा गादम, वय ५९ वर्षे, उंची ५.५ फूट, रंग सावळा, बांधा सडपातळ आहे. त्यांचे केस पिकलेले असून, ते डाव्या डोळ्याने नीट पाहू शकत नाहीत. त्यांच्या डाव्या मनगटाजवळ ‘निशुल’ नावाचा टॅटू गोंदलेला आहे. बेपत्ता होण्याच्या वेळी त्यांनी निळ्या रंगाचा रेनकोट, आत फिकट पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली होती. त्यांच्याकडे सुमारे १०,००० रुपये रोख रक्कम होती, मात्र कोणतेही मौल्यवान दागिने किंवा वस्तू नव्हत्या.
हर्णे पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करत आहेत. दासु चिन्नाचन्नप्पा गादम यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हर्णे बाजारपेठेतून ५९ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
