GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो तरीही संपूर्ण ग्रामीण भाग जिल्हा परिषदेला पाणी टंचाईमुक्त करता आला नाही – सुहास खंडागळे

Gramin Varta
139 Views

लोकांच्या प्रश्नांची जाण नसणारे लोक निवडून जात असल्याने अनेक योजना येऊनही पाणी समस्या असल्याचा आरोप

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असतानाही, जिल्हा परिषदेला जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग पाणी टंचाईमुक्त करण्यात इतक्या वर्षांत यश आलेले नाही. जल स्वराज, राष्ट्रीय पेयजल योजना आणि सध्या सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ सारख्या योजना असूनही ही परिस्थिती कायम आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासन आणि निवडून गेलेले सदस्य पाणी पुरवठा करण्याच्या आपल्या मूळ कर्तव्यात अपयशी ठरले आहेत, असे परखड मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘जल जीवन मिशन’ योजना जिल्ह्यातील अनेक भागांत, विशेषतः संगमेश्वर तालुक्यासह अन्य काही भागांत अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी, नागरिकांना त्यांच्या हक्काचे दररोज प्रति मानसी ५५ लिटर पाणी अनेक गावांमध्ये मिळत नाहीये. मुबलक पाणी पुरवठा करणे हे जिल्हा परिषदेचे प्रमुख कर्तव्य असतानाही, ग्रामीण भागाला पाणी देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषद पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी टीका खंडागळे यांनी केली आहे.
ठोस हालचालींचा अभाव:
सुहास खंडागळे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, अपूर्ण जल जीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणत्याही ठोस हालचाली दिसत नाहीत. जर नागरिकांना वेळेत त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणार नसतील, तर जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांचे प्रश्न बेधडकपणे मांडणारे आणि प्रशासनाला जाब विचारणारे प्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे.
मतदारांना आवाहन:
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील मतदारांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. “केवळ ठेकेदार आणि धनाढ्य लोक जिल्हा परिषदेत निवडून गेल्यास जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन तरी मतदारांनी येणाऱ्या काळात चांगले आणि तळमळीने काम करणारे उमेदवार निवडून द्यावेत. जिल्हा परिषद हे काही लोकांच्या राजकीय सोयीचे ठिकाण नसून ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्याचे ते प्रभावी माध्यम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्या गावांमध्ये जल जीवन मिशन योजना अर्धवट आहेत किंवा ज्यांना पाणी टंचाईच्या समस्या भेडसावत आहेत, अशा नागरिकांनी ‘गाव विकास समिती’कडे आपल्या समस्या मांडाव्यात. गाव विकास समिती या प्रश्नांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन सुहास खंडागळे यांनी दिले आहे.

Total Visitor Counter

3073091
Share This Article