GRAMIN SEARCH BANNER

जैतापूरचा आर्यन राऊत ‘कोकण कप’ कॅरमचा अजिंक्य विजेता!

Gramin Varta
46 Views

राजन लाड/जैतापूर :रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान ठरलेला जैतापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आर्यन राऊत याने राज्यस्तरीय सुपर लीग ‘अडसूळ ट्रस्ट–कोकण कप’ शालेय कॅरम स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. आपल्या अचूक नेमबाजी, संयम आणि रणनीतीच्या जोरावर आर्यनने कोकणात आपले क्रीडातेज दाखवले.

आर्यन हा जैतापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत यांचा चिरंजीव असून, त्याच्या या यशामुळे जैतापूर गावासह संपूर्ण कोकणाचा मान उंचावला आहे.

ही प्रतिष्ठित स्पर्धा आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आणि कोकण क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

सहा टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील तब्बल २१८ शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

अंतिम सहाव्या टप्प्यात आर्यन राऊतचा सामना तिसऱ्या टप्प्यातील विजेता प्रसन्न गोळे याच्याशी झाला. डावाच्या सुरुवातीला ८–४ अशी आघाडी घेतलेल्या गोळेने जोरदार सुरुवात केली होती; मात्र अचूक नेम, संयम आणि रणनीतीच्या बळावर आर्यनने अप्रतिम पुनरागमन करत १७–१२ अशा फरकाने विजय मिळवला. या शानदार कामगिरीसह आर्यनने साखळीतील सर्वाधिक १० गुण मिळवून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

स्पर्धेत प्रसन्न गोळे आणि पुष्कर गोळे यांनी संयुक्त द्वितीय स्थान, तनया दळवी (राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू) आणि उमैर पठाण यांनी संयुक्त तृतीय स्थान, तर तीर्थ ठाकर, शौर्य दिवेकर, ग्रीष्मा धामणकर, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण आणि विराज बर्वे यांनी संयुक्त चौथे स्थान पटकावले.

उत्तम खेळ दाखवणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये वेदिका पोमेंडकर, रविराज गायकवाड, एन्जेल पटवा, ओम सुरते, आरव आंजर्लेकर, आर्या सोनार आणि चैतन्य पोमेंडकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विजेत्या खेळाडूंना ट्रस्टचे सचिव विष्णू तांडेल, युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्ट, क्रीडाप्रेमी संजय मांजरेकर, पंच चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, अविनाश महाडिक तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील शालेय खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ लाभले असून, आर्यन राऊतसारख्या तरुण खेळाडूंच्या यशामुळे ग्रामीण भागातही कॅरम या खेळाची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitor Counter

3199424
Share This Article