तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मंजूर करण्यात आला असून, यासाठी पाठपुरावा करणारे माजी कृषीमंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांचा पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
या निर्णयासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समितीच्या वतीने पत्रव्यवहार व निवेदन सादर करण्यात आले होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि नेत्रावती एक्सप्रेसचा राजापूर रोड येथील थांबा निश्चित झाला.
स्थानिक प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत या स्थानकावर मोजक्या गाड्याच थांबत होत्या. त्यामुळे सणासुदीच्या काळात चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. नव्या थांब्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून पंचक्रोशी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सत्कार समारंभ मंत्रालयात पार पडला. यावेळी पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे मुख्य सल्लागार अनिल भोवड, अध्यक्ष विश्वास राघव, कार्याध्यक्ष संतोष जोगळे, खजिनदार अनिल राऊत, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, सहखजिनदार सुशांत आडिवरेकर, समन्वयक समिती प्रमुख संतोष गोठणकर, फेसबुक मीडिया प्रमुख दिनेश कुडकर तसेच सदस्य उमेश हातणकर, सुरेंद्र भाताडे, एकनाथ शिवगण, प्रदीप तोस्कर, सचिन पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.