GRAMIN SEARCH BANNER

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

Gramin Search
4 Views

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी ५ जुलै २०२५ रोजी विद्यापीठांतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रात सुरू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा सखोल आढावा घेतला आणि उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी, केंद्राचे नवनियुक्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. केतन चौधरी यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. कुलगुरूंनी केंद्राच्या झाडगाव येथील तलावांची पाहणी केली. मत्स्य संवर्धन आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी त्यांनी तलावांमध्ये बोयर माशांचे बीज सोडून त्यांचे संवर्धन करण्याचे सुचवले.

डॉ. भावे यांनी मत्स्य संवर्धन प्रयोगशाळेतील शोभिवंत माशांचे बीजोत्पादन, शैवाळ बीज बँक प्रयोग, अक्वापोनिक प्रकल्प आणि पाणवनस्पती संवर्धन यांसारख्या विविध कामांची पाहणी करून आढावा घेतला. विद्यापीठ परिभ्रमण निधीअंतर्गत सुरू असलेल्या ‘मत्स्यालय व संग्रहालय प्रदर्शन’ आणि ‘तलावामध्ये नौकाविहार’ या प्रकल्पांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

केंद्राच्या पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नवीन इमारत बांधकामाबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच, केंद्राच्या भविष्यातील शेतकरी-केंद्रित कार्यासाठी कुलगुरूंनी अनेक सूचना केल्या.
यावेळी डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरीश धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), सौ. व्ही. आर. सदावर्ते व सौ. अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. दिनेश कुबल (बोटमन) तसेच प्रा. एम. टी. शारंगधर (सहयोगी प्राध्यापक) व डॉ. वैभव येवले (विषय तज्ञ) उपस्थित होते. शेवटी, डॉ. आसिफ पागरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Total Visitor Counter

2648885
Share This Article