संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथील स्वराज्य पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव बसने दुभाजक तोडून समोर उभ्या असलेल्या एका गाडीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यात एका ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. अपघात घडवल्यानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला. बस क्रमांक MH ०४ LY ६६७६ ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना चालकाने ती निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवली. या बेदरकारपणामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावरील दुभाजक तोडला. त्यानंतर ती विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली.
त्याचवेळी, पंक्चर काढण्यासाठी दुकानासमोर थांबलेल्या MH ०२ BJ १५१२ या गाडीला बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गाडीचे मोठे नुकसान झाले. या गाडीत बसलेले प्रवासी सौ. अबोली कल्पेश घडशी (वय ४०), सौ. रुद्रा रुपेश घडशी (वय ३५) आणि त्यांचा मुलगा वेद कल्पेश घडशी (वय ५) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात बसचालक कोणताही माणुसकी न दाखवता घटनास्थळावरून पळून गेला.
जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चंद्रकांत गोविंद घडशी (वय ६२, रा. आंबव पोक्षे, संगमेश्वर) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी अज्ञात बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमेश्वर : आरवली येथील भीषण अपघात तिघे जखमी, खासगी बस चालकावर गुन्हा
