करबुडे फाट्यावर किरकोळ वादातून तरुणाला लोखंडी खांबावर ढकलून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
585 Views

रत्नागिरी : वेतोशी येथे झालेल्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला लोखंडी खांबावर जोरात ढकलून दुखापत केल्याची घटना करबुडे फाटा येथे घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश सुरेश गोरे (वय ३८, रा. वेलवंड धनगरवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या आतेभावासोबत चिरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी करबुडे फाटा येथे गेले होते. यावेळी आरोपी जगदिश कृष्णा झोरे (वय ३५, रा. वेतोशी धनगरवाडी, ता. जि. रत्नागिरी) याने काही दिवसांपूर्वी वेतोशी गावात झालेल्या बैठकीत महेश गोरे व त्यांचा भाऊ राजेश शिंदे हे गावातील रहिवासी नसतानाही उपस्थित राहिल्याचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

याबाबत गोरे यांनी आरोपीला विचारणा केली असता, झोरे याने त्यांना जाणूनबुजून बाजूला असलेल्या बंद दुकानाच्या शेडच्या लोखंडी खांबावर जोरात ढकलून दिले. त्यामुळे गोरे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून गोरे व त्यांच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महेश गोरे यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक १५३/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4667322
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *