चिपळुणात एसटी बसच्या गर्दीवरून राडा; आगारात काच फोडून प्रवाशाचा धिंगाणा

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

वाहतूक नियंत्रकांना शिवीगाळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान; प्रवाशावर गुन्हा दाखल

चिपळूण : एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याच्या कारणावरून एका प्रवाशाने चिपळूण बसस्थानकात वाहतूक नियंत्रकांशी वाद घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारे 6.20 वाजता घडली. संतापाच्या भरात संबंधित प्रवाशाने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दर्शनी काचेवर जोरात प्रहार करून ती फोडली, तसेच संगणकालाही धक्का दिल्याने मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी मंगेश मनोहर चव्हाण (वय 29, रा. भोम) याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद चिपळूण आगारातील वाहतूक नियंत्रक विनायक भास्कर कुसाळकर (रा. संगमेश्वर) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 4 ते दुपारी 12 या वेळेत विनायक कुसाळकर हे कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत वाहतूक नियंत्रक ताहीर नेवरेकर आणि पाळी प्रमुख संजय यादव हेही उपस्थित होते. पहाटे सुमारे 5.20 वाजता चालक महादेव म्हैसागर आणि वाहक सुनील शिंदे यांनी चिपळूण–रेल्वे स्टेशन ही बस आगारात आणली. या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती.

बसमधून उतरल्यानंतर मंगेश चव्हाण हा थेट वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ गेला आणि ‘इतके प्रवासी बसमध्ये का घेतले?’ असा उर्मट सवाल करत कुसाळकर यांच्याशी वाद घालू लागला. निवडणुकीमुळे गर्दी वाढल्याचे सांगत कुसाळकर यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रार असल्यास अधिकृत पद्धतीने नोंदवण्याचा सल्लाही दिला. मात्र यामुळे चव्हाण अधिकच चिडला. त्याने वाहतूक नियंत्रकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आणि रागाच्या भरात नियंत्रण कक्षाच्या काचेवर हाताने जोरदार प्रहार करून ती फोडली. यावेळी संगणकाला धक्का बसून तो खाली पडला.

घटनेची माहिती तातडीने चिपळूण पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत संबंधित प्रवासी बसस्थानकातून निघून गेला होता. पोलिसांनी शोध घेतला असता तो गुहागर नाका परिसरात आढळून आला. शासकीय कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *