GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा मतदान केंद्रावर दोनदा ईव्हीएम बदलावी लागली; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा मतदान केंद्रावर प्रशासकीय नियोजनातील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या. ईव्हीएम मतदान यंत्रांमध्ये वारंवार झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हातखंबा मतदान केंद्रावर शनिवारी सकाळच्या सत्रात पहिल्यांदा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने ती बदलण्याची वेळ आली. मात्र दुपारच्या सत्रात दुसऱ्या एका मतदान कक्षातील मशीननेही काम करणे बंद केले. मतदाराने बटण दाबल्यानंतर लाल दिवा तसाच राहणे तसेच मत नोंद झाल्याचा आवाज न येणे, अशा तांत्रिक तक्रारी समोर आल्या.

दोन ते तीन वेळा मशीन तपासूनही दोष दूर न झाल्याने अखेर केंद्रप्रमुख आणि तलाठी यांनी संबंधित ईव्हीएम बदलण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेमुळे मतदान सुमारे 15 ते 20 मिनिटे थांबले. या काळात मतदानासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.वारंवार मशीन बिघाडाच्या घटना घडत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाच्या पूर्वनियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सकाळपासूनच मशीन दुरुस्ती आणि बदलाची प्रक्रिया सुरू राहिल्याने मतदानाचा वेग मंदावला. पर्यायी मशीन बसवून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले असले तरी मतदारांमध्ये अस्वस्थता कायम राहिली.

Total Visitor Counter

3485445
Share This Article