अचानक उभारलेल्या गतिरोधकांमुळे चिपळुणात अपघातांची मालिका, 4- 5 दुचाकीस्वार पडून जखमी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

नगर परिषदेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप

चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरातून जाणाऱ्या कराड रोडवर नगर परिषदेने कोणतीही पूर्वकल्पना न देता उभारलेले गतिरोधक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. युनायटेड स्कूल परिसरात दोन तर सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाजवळ आणखी दोन असे चार गतिरोधक अचानक टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या अनियोजित गतिरोधकांमुळे अवघ्या दोन दिवसांत चार ते पाच दुचाकी अपघात घडले असून, अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. यामध्ये मार्कंडी येथील रहिवासी अनिल फटकरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. पुढील उपचारासाठी हाताच्या हाडात प्लेट बसवावी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या गतिरोधकांबाबत कोणतेही सूचना फलक, रस्त्यावर पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच वेगात येणाऱ्या वाहनचालकांना हे गतिरोधक अचानक दिसत नसून अपघातांची शक्यता वाढत आहे.

हे गतिरोधक कोणाच्या सूचनेनुसार आणि कोणत्या तांत्रिक निकषांवर टाकण्यात आले, असा सवाल स्थानिक दुचाकीस्वार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच कराड रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी असते, त्यातच अशा प्रकारे नियोजनशून्य गतिरोधक टाकून नगर परिषद नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा संतप्त सवाल जखमी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.

नगर परिषदेने तातडीने या सर्व गतिरोधकांवर योग्य सूचना फलक, रस्ते चिन्हांकन आणि रिफ्लेक्टर बसवावेत तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *