सचिन यादव | संगमेश्वर : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी यंदा पर्यटकांनी गोव्यापेक्षा कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीकडे अधिक पसंती दर्शवली आहे. नाताळच्या सुट्ट्यांचे औचित्य साधत राज्यभरातून हजारो पर्यटक कोकणात दाखल झाले असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेली आहेत. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारे, हिरवेगार निसर्गसौंदर्य आणि आपुलकीचा कोकणी पाहुणचार यामुळे कोकण हे यंदाच्या पर्यटन हंगामाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
शिरोडा, मालवण, श्रीवर्धन, दिवेआगर आदी समुद्रकिनाऱ्यांवर सकाळपासूनच पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून संपूर्ण परिसराला जत्रेसारखे स्वरूप आले आहे. गर्दी आणि धकाधकीपासून दूर, शांत व कौटुंबिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी यंदा गोव्याला बगल देत कोकणची निवड केल्याचे दिसून येत आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारील राज्यांतूनही मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत आहेत.
पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या जलक्रीडांनाही मोठी मागणी आहे. मालवण, दिवेआगर आणि निवती येथील समुद्रकिनाऱ्यांवर पॅरासेलिंग, जेट स्की, बोट राईड यांचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी होत आहे. निळ्याशार समुद्रावरून विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येत असून, वाढत्या गर्दीमुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पर्यटकांच्या या मोठ्या ओघाचा परिणाम थेट पर्यटन व्यवसायावर झाला असून रायगडसह कोकणातील बहुतांश हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे पूर्णतः बुक झाले आहेत. अनेक ठिकाणी राहण्याची व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, आधीच आरक्षण केलेल्या पर्यटकांनाच प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः घरगुती ‘होमस्टे’ना मोठी मागणी असून यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान झाले आहे.
स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक, हस्तकला विक्रेते आणि पर्यटनाशी निगडित इतर घटकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, कोकणात सध्या खऱ्या अर्थाने ‘पर्यटन पर्व’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नववर्ष स्वागतासाठी गोव्याऐवजी कोकणाला पर्यटकांची पसंती; किनारपट्टीवर तोबा गर्दी





