आढळल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
वैभव पवार / गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे २५ ऑक्टोबर रोजी समुद्रात बुडून बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार (वय ३५, हमरापूर, ता. पेण, जि. रायगड) यांचा शोध अद्याप लागलेला नाही. घटनेला पंधरा दिवस उलटून गेले असतानाही जयगड सागरी पोलीस ठाणे, स्थानिक जीव रक्षक व ग्रामसुरक्षा दल यांच्या संयुक्त प्रयत्नांनंतरही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
नितीन पवार हे आपल्या कुटुंबासह २५ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी आंघोळीसाठी समुद्रात प्रवेश केला असता ते समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. त्यानंतर ते बेपत्ता झाले असून, त्या दिवसापासून जयगड पोलिसांचा शोधमोहीम अखंड सुरू आहे.
जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक, बोटींच्या सहाय्याने समुद्रात गस्त घालत असून, गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, वरवडे, नेवरे आणि काजीरभाटी परिसरात देखील तपास सुरू आहे. खडकाळ व डोंगराळ किनारपट्टीत देखील पथकांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.
या संपूर्ण घटनेबाबत स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ व जीवनरक्षक दलाचे सदस्य हे देखील पोलिसांना सहकार्य करत आहेत. तरीही नितीन पवार यांचा काहीच मागमूस लागलेला नाही. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून “हरवला आहे” अशी माहिती आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांना त्यांच्या शोधासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जयगड सागरी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बेपत्ता नितीन पवार हे गणपतीपुळे परिसरात किंवा नजीकच्या कोणत्याही समुद्रकिनारी आढळल्यास तात्काळ जयगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
घटनेनंतर नितीन पवार यांच्या कुटुंबीयांवर दुःख आणि चिंतेचे सावट पसरले असून, संपूर्ण गणपतीपुळे परिसरातून त्यांच्या परिवाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिक मानवतेच्या भावनेतून त्यांच्या शोधात सतत मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा 15 दिवसानंतर थांगपत्ता नाही, शोध अद्यापही सुरू







